पावन कडाप्याचा
सुवर्ण इतिहास
श्री बापूजी बुवा आणि श्री कालिकाई (कडापकरीण) - बहुसंख्य कायस्थ कुटुंबांचे कुलस्वामी व कुलस्वामिनी.
श्रीबापुजी बुवा, श्रीकालिकाई (कडाप्याची -श्री कडापकरीण देवी) हे बहुसंख्य कायस्थ कुटुंबांचे कुलस्वामी व कुलस्वामिनी आहेत. हे देवस्थान फार पुरातन असून ते मुंबई गोवा रस्त्यावर माणगाव पासून निजामपूर रस्त्यावर सुमारे 20 कि. मी. आहे. पुरातन मंदिराचा जीर्णोध्दार होऊन नवीन मंदिर, सभामंडप, स्वयंपाकघर फार वर्षापूर्वीच पूर्ण झाले असून या मंदिरामध्ये 1) श्रीबापुजीबुवा, 2) श्रीकालिकाई (3) श्रीबाहिरीबुवा, 4) श्रीम्हाळसा खंडोबा (4) श्रीबाणाई (6) श्रीभवानी 7 श्री वाघजाई 8 श्रीजरी आई 9 श्रीमरीआई अशा देवदेवतांच्या मूर्ती आहेत. श्रीबापूजी बुवा, श्री कालिकाई या दोन मूर्ती व्यतिरिक्त स्थापित मूर्तीचा जीर्णोध्दार करून त्यांचे शास्त्रोक्त विसर्जन करून पुनः : प्रतिष्ठापना विधि 2006 मध्ये पूर्ण झाला आहे. या देवळाची आख्यायिका अशी सांगतात की, प्राचीन काळी शिवाला कैलास पर्वतावर आपल्या भक्तांविषयी मनाला चिंता, तळमळ लागली, म्हणून आपल्या भक्तांना तारण्यासाठी, सांभाळण्यासाठी शिव 'कैलास सोडून पृथ्वीवर (भूमीवर) अवतरले. ज्या. भूमीवर श्रीशिवशंकर अवतरले ते गाव म्हणजे आपले श्री क्षेत्र कडापे. ज्यावेळी शिव ह्या भूमीवर अवतरले त्यावेळी या ठिकाणी एक गवळी वाडा होता. या गवळी वाड्यामध्ये बापू नावाच्या गवळ्याचा गाईंचा गोठा होता. एके दिवशी या गोठ्यामध्ये जमीनीमधून पाषाणाचा उंचवटा वर आला, सकाळी गोठा साफ करताना, पाषाणाचा उंचवटा जमीनीतून वर आल्याचे बापू गवळ्याच्या निदर्शनास आले. त्या उंचवट्यास चोपण्याने चोपून जमीन सारखी करण्याचा प्रयत्न केला. चोपण्याने चोपून जमीन सारखी झाली नाहीच, परंतु त्या पाषाणाच्या उंचवट्या मधून रक्ताची धार वाहू लागली. रक्ताची धार वाहाताना पाहून बापू गवळी खूप घाबरले . त्याला काही सुचेना, तेव्हा तो गुपचूप घरी जाऊन बसला. अशा परिस्थिती मध्ये तो दिवस मावळला, रात्र झाली, रात्री झोपल्यानंतर मध्यराचीनंतर पहाटेच्या वेळी शिव सांग भोळा स्वप्नात येऊन सांगू लागला की माझ्या भक्तांना तारण्यासाठी मी या गावात, या स्थळी येऊन कायमची वस्ती केली आहे. हे स्वप्न पाहून बापू गवळ्याला खूप आनंद झाला. त्याने आपले स्वप्न आपल्या बायकोला सांगितले. आपल्या गावात देव आहे म्हणून दोघांनाही खूप आनंद झाला, उभयतांनी शुचिर्भूत होऊन गंध, फुले, बेल ह्यांनी पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य दाखविला, मंगल आरती केली, व हात जोडून प्रार्थना केली की आपण आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी कडाप्याला चिरकाल रहावे, आणि जो भक्त आपली पूजाअर्चा अभिषेक सेवा करेल, त्याची सर्व संकटे दूर करून त्यांना त्यांच्या जीवनात सुखी समाधानी करावे. बापू गवळ्याच्या गोठ्यात देव आहे, म्हणून या 'देवाचे नाव बापूजी ठेवावे असे सर्व ग्रामस्थांनी ठरविले, व ते बापुजी बुवा नावाने प्रसिद्ध आहे. बापू गवळ्याने आपल्या स्वताचा उदार कामाठी बापूजी महाराजांची प्रार्थना केली ही त्याची विनवणी/प्रार्थना ऐकन शिवशंकर प्रसन्न झाले.
श्रीबापुजीबुवा कडप्यामध्ये कायमचे वास्तव्य करून राहिल्यानंतर त्यांनी श्रीकालिकामातेला आपल्याकडे भक्तांचे रक्षण करण्यासाठी बोलावून घेतले -श्रीबापुजीबुवांनी श्रीकालिकामातेला बोलावून घेतल्यानंतर ही कालिका आपला वेष पालटून धारणीचा वेश करून आपल्या भक्तांसाठी 'धावून आली. भक्तांसाठी वेगाने धावत येताना त्या ठिकाणचे तिला भान राहिले नाही आणि त्याच वेगाने ती पुढे जाऊ लागल्यानंतर श्री बापुजींना हे समजले व त्यांच्या गणांनी श्रीकालिकेचा मार्ग रोखला. श्री बापुजींनी श्रीकालिकेला आहे तिथेच थांबण्यास सांगून (म्हणून श्रीकालिकेचे तोंड वायव्य - -दिशेकडे राहिले) भक्तांचे रक्षण करण्यासाठी तू माझ्या जवळ कायमचे वास्तव्य कर असे सांगितले. श्रीकालिकेने श्रीबापुजीचा शब्द मान्य केला, परंतु कायमचे वास्तव्य करण्यासाठी काही अटी मागितल्या, त्या अशा की, भक्तांचे रक्षण करण्यासाठी मी कायम तुझ्या उजव्या हाती बसेन, त्याचप्रमाणे माझी वस्ती कायम भूमी मध्ये असेल, आणि माझे सर्व भक्त प्रथम तुमचा मान करतील आणि नंतर माझा मान करतील. श्रीबापुजींनी ह्या सर्व अटी मान्य केला व श्रीकालिकेची वस्ती श्रीबापुजींच्या उजव्या हाताला आणि भूमीमध्ये झाली; त्याचप्रमाणे या देवळात प्रथम श्रीबापुजींची पूजा मान केला जातो व नंतर श्री कालिकाईचा केला जातो. ही श्रीकालिका कड़ापे गावात कायमची वस्ती करून राहिली म्हणून ती श्री कडपकरिण नावाने प्रसिद्ध झाली. ही श्रीकडापकरीण देवी कायस्थांची कुलस्वामिनी असून सज्जनांचे रक्षण करून दुष्टांची ती मर्दिनी आहे. कायस्थांच्या संकटांना धावून येते आपल्या भक्तांचे रक्षण करते अशी सर्व भक्तांची श्रद्धा आहे.
मुख्य मूर्ती व देवपरिवार
मंदिरातील नऊ प्रमुख देवतांच्या मूर्तींचे मंगल दर्शन
श्री बापुजी बुवा
श्री कालिकाई
श्री बहिरी बुवा
श्री म्हाळसा खंडोबा
श्री बाणाई
श्री भवानी
श्री वाघजाई
श्री जरी आई
श्री मरी आई
२००६
प्रतिष्ठापना वर्ष
भक्तीचा सुवर्णकाळ आणि
शास्त्रीय पुनर्रचना
पुरातन मंदिराचा मूळ गाभा टिकवून आधुनिक सभामंडप आणि स्वयंपाकघराची निर्मिती करण्यात आली. श्री बापुजी बुवा आणि श्री कालिकाई या मुख्य मूर्तींचा पावित्र्य जपून, इतर सर्व परिवार देवतांचा जीर्णोध्दार करून **२००६** मध्ये शास्त्रोक्त विसर्जन व पुनः प्रतिष्ठापना विधी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आज हे पावन क्षेत्र भाविकांच्या भक्तीने न्हाऊन निघाले आहे.
॥ बापुजी बुवांच्या चरणी नतमस्तक ॥
कायस्थांचे कुलदैवत आणि समस्त भक्तांचे रक्षणकर्ते श्री कडापकरीण देवीच्या दर्शनासाठी या.